ग्रंथालय मित्र मंडळ
कल्पना आणि विस्तार
ग्रंथालय मित्र मंडळ
कल्पना आणि विस्तार
मानवाच्या विकासात ज्ञानार्जनाला अनन्यसाधारण महत्व आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु मानवाला गुणात्मक विकास साधण्यासाठी ज्ञानार्जनाची आवश्यकता आहे. ज्ञानार्जनाच्या साधनांपैकी ‘वाचन’ हे एक प्रमुख साधन आहे. अनेक जाणकारांनी आणि विचारवंतांनी आपले विचार ग्रंथरूपात मांडून विचारांचे लोकार्पण केले आहे. या ज्ञानाच्या बहुमूल्य साठ्याचे जतन आणि संवर्धन करणे तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे समाजाच्या विकासास अत्यंत आवश्यक आहे. हे बहुमूल्य काम ग्रंथालये करत असतात. मानवाच्या विकासात ग्रंथालयांनी बहुमूल्य कामगिरी पार पाडली आहे. प्राचीन भारतातील नालंदा विश्वविद्यालयाचे प्रसिद्ध ग्रंथालय आणि त्याचे सामाजिक विकासातील योगदान सर्वश्रुत आहे.
महाराष्ट्राच्या विकासात देखील ग्रंथालयांचे फार मोठे योगदान आहे. १९२८ साली सर्वप्रथम रत्नागिरी येथे सार्वजनिक ग्रंथालयाच्या स्थापनेची नोंद आहे. त्यानंतर पुढील ५० वर्षात इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण, ब्रह्मपुरी, राजगुरुनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इत्यादी ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना झाली. तत्कालीन संस्थानिक, सामाजिक नेते आणि विचारवंतांचे यात फार मोठे योगदान आहे. सामाजिक सुधारणा आणि स्वराज्याबाबतचे विचार समाजात पसरवण्यात सार्वजनिक ग्रंथालये अग्रस्थानी होती.
स्वातंत्रोत्तर काळात ग्रंथालय चळवळ जोमाने फोफावली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले. त्याअनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर गावोगावी ग्रंथालये स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचालनालयामार्फत अनुदान देण्यात येते. शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर राज्यात एकूण १२,००० हुन अधिक ग्रंथालये आहेत. कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. नव्या तंत्राचा वापर करत अनेकांनी संगणकीकरण केले, बार कोड पद्धत सुरू झाली. काही ग्रंथालयांनी जुने ग्रंथ, हस्तलिखिते स्कॅन करून त्याचे ई-बुक केले गेले. वाचकांना घरूनच इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकते. ते पुस्तक घरपोच मिळू शकते.
आधुनिकरणाचा जसा फायदा ग्रंथालयांना झाला तशीच नवी आव्हाने देखील ग्रंथालयांसमोर राहिली. इंटरनेट आणि डिजिटायझेशन यामुळे वाचकाला पुस्तके विमाहिती घरबसल्या मिळू लागली. यासाठी ग्रंथालयाकडे जाण्याची आवश्यकता वाचकाला राहिली नाही. अर्थात सभासदांची संख्या रोडावली. सभासद वर्गणीमधून येणारे उत्पन्न बरेच घटले. कर्मचारी वेतन, वीज, भाडे यात एकाबाजूने सतत वाढ होत होती. परंतु सरकारकडून येणाऱ्या अनुदानात वाढ झाली नाही. यामुळे ग्रंथालयांचा विकास तर सोडा, दैनंदिन गरजा पूर्ण करणे देखील सार्वजनिक ग्रंथालयांना अशक्य झाले.
यापरीस्थीत तग धरून राहण्यासाठी आणि समाजातील आपली उपस्थिती सार्थ करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना नव्या दिशेनी विचार करणे आवश्यक आहे. ‘समाज विकासासाठी ज्ञानाचा प्रसार’ हे ग्रंथालयाचे मूळ उद्दिष्ट समोर ठेऊन वचनेतर प्रकल्पांवर देखील ग्रंथालयांनी विचार करणे आवश्यक आहे. ग्रंथालय ही केवळ वाचनाची जागा न राहता ते एक संस्कृतीच्या देवाणघेवीची केंद्र बनणे आवश्यक आहे. व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चा सत्र, स्पर्धा परीक्षा आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण, इत्यादी ज्ञानार्जनाच्या इतर माध्यमांचे ग्रंथालय हे केंद्र बाणाने आवश्यक आहे.
ग्रंथालय मित्रमंडळ
ग्रंथालय मित्रमंडळ यासारख्या संस्थांची चळवळ अमेरिकेसारख्या प्रगत देशात फार पूर्वीपासून सुरु आहे. ज्याप्रमाणे ‘गाव तेथे ग्रंथालय’ तसेच ‘गाव तेथे ग्रंथालय मित्रमंडळ’ ही कल्पना महाराष्ट्रातही पुढे येणे आवश्यक आहे. ग्रंथालय मित्र मंडळाचे प्रमुख उद्देश आपल्या नजीकच्या ग्रंथालयांना मदतीचा हात पुढे करणे हा आहे. ही मदत दोन प्रकारात करता येईल. एक, ग्रंथालयाच्या नित्य कार्यक्रमात मदत करणे. यात ग्रंथालयांना भौतिक सुविधा पुरवणे, नवीन पुस्तके उपलब्ध करून देणे, समाजात वाचनाची आवड रुजू करून ग्रंथालयाच्या सभासदांची वाढ करण्यात मदत करणे इत्यादी साहाय्य अंतर्भूत करता येईल. दुसऱ्या प्रकारात ग्रंथालयांना वर नमूद केलेल्या ज्ञानार्जनाच्या इतर माध्यमांचा प्रसार करण्यात मदत करणे हा होय. उदाहरणार्थ, ग्रंथालयाच्या बरोबरीने व्याख्यानमाला आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे व चर्चा मित्रांचे आयोजन, स्पर्धा परीक्षा आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण याचे आयोजन इत्यादी.
या उद्देशाने ‘ग्रंथालय मित्रमंडळ’ याची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाच्या प्राथमिक उपक्रमात काही ग्रंथालये दत्तक घेण्यात आली आहेत. या ग्रंथालयांना गरजेनुसार वेगवेगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न मंडळ करत आहे. यात ग्रामीण भागातील ग्रंथालयांना विशेष प्राधान्य दिले जाते. “लेखक आपल्या भेटीला” हे नवीन दालन मंडळ सुरु करत आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्रंथालय आणि लेखक यांची भेट घडवून आणण्याचे कार्य मंडळ करेल. ग्रंथालयात लेखकांचे व्याख्यान आयोजित करून त्यायोगे वाचकांना लेखकाचे विचार समजावून घेण्याचा लाभ मिळेल. यातून वाचन संस्कृती वाढावी ही अपेक्षा आहे.