ग्रंथालय मित्र मंडळ आणि प्राच्य विद्या संस्थेच्या वतीने दिनांक १८ जुलै २०२६ रोजी प्राच्य विद्या अभ्यास संस्था, हजुरी, ठाणे येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.३० या वेळेत विविध सार्वजनिक, शैक्षणिक व संस्थात्मक ग्रंथालयांतील ग्रंथपाल, ग्रंथालय पदाधिकारी, वाचन चळवळीतील कार्यकर्ते आणि अभ्यासक यांची संयुक्त बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
बैठकीच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. श्री सुधीर बढे आणि श्री दिनकर गांगल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीतून विविध ग्रंथालयांना एकत्र आणण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू झाला. त्यांच्या या क्षेत्रातील दीर्घ अनुभवामुळे आणि दूरदृष्टीमुळे विविध ग्रंथालयांना एकत्र येऊन ग्रंथालय मित्र मंडळ हे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.
बैठकीचा उद्देश केवळ विविध ग्रंथालयांसमोरील समस्या मांडणे हा नसून, त्या समस्यांवर सामूहिकरीत्या विधायक उपाय शोधणे आणि वाचन संस्कृती जोपासणे व त्या अनुषंगाने काही ठोस उपक्रम आखून एक कृती आराखडा तयार करणे हा होता. त्यानुसार सर्व उपस्थितांनी अत्यंत सकारात्मक, मोकळ्या आणि रचनात्मक वातावरणात आपले अनुभव, निरीक्षणे आणि सूचना मांडल्या.
चर्चेदरम्यान खालील प्रमुख मुद्दे अधोरेखित करण्यात आले –
वाचन संस्कृतीत होत असलेली घट.
लहान मुले व युवकांचा ग्रंथालयाकडे कमी होत चाललेला ओढा.
मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा वाढता प्रभाव.
बदलत्या वाचकांच्या गरजांनुसार पुस्तकसंग्रह अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता.
ग्रंथालयातील पायाभूत सुविधा, आर्थिक मर्यादा व मनुष्यबळाच्या समस्या.
ग्रंथालय उपक्रमांची समाजापर्यंत पुरेशी माहिती न पोहोचणे.
या सर्व समस्यांवर केवळ चर्चा न करता, त्यावर अमलात आणता येतील अशा उपयुक्त उपाययोजनांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उपाययोजना
आजच्या डिजिटल युगात ग्रंथालयांनी काळानुरूप स्वतःमध्ये बदल स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.
सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब इत्यादी माध्यमांतून ग्रंथालयाच्या उपक्रमांचा नियमित प्रचार करणे.
पुस्तक परिचय, लेखक परिचय, नवीन पुस्तकांची माहिती, वाचन प्रेरणादायी संदेश यांचे डिजिटल प्रसारण करणे.
ई-ग्रंथालय, ई-पुस्तके आणि डिजिटल संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे.
तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे.
आकर्षक आणि स्वागतशील ग्रंथालय व्यवस्था तयार करणे .
ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकाला आनंददायी अनुभव मिळावा यासाठी पुढील बाबींवर भर देण्यात आला.
स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वातावरण.
आकर्षक वाचन दालन.
माहितीपूर्ण व प्रेरणादायी फलक.
मुलांसाठी स्वतंत्र वाचन कोपरा.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी सुविधा.
वाचकांशी आत्मीयतेने संवाद साधणारा, स्वतः वाचन करणारा आणि वाचनाची प्रेरणा देणारा ग्रंथपाल.
यावर सर्वांचे एकमत झाले की “स्वागतशील ग्रंथालय आणि वाचकाभिमुख ग्रंथपाल” हेच ग्रंथालयाचे सर्वात मोठे आकर्षण असते.
युवक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग
आजचा विद्यार्थी आणि युवक कोणत्या प्रकारचे साहित्य वाचतो, त्याची अभिरुची काय आहे, याचा अभ्यास करून त्यानुसार पुस्तक खरेदी करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
पुस्तक प्रदर्शनांमध्ये पालक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने योग्य साहित्य उपलब्ध करून दिल्यास ते निश्चितच ग्रंथालयाकडे आकर्षित होतील, असे मत व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयांनी संयुक्तपणे काम करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
समाजाशी संवाद
ग्रंथालय हे समाजाचे सांस्कृतिक केंद्र व्हावे यासाठी पुढील कार्यक्रम नियमित आयोजित करण्याची सूचना करण्यात आली.
विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींशी संवाद.
लेखक भेट.
कवी संमेलन.
व्याख्यानमाला.
मुलाखत कार्यक्रम.
करिअर मार्गदर्शन.
पुस्तक चर्चा.
साहित्य संमेलने.
वाचन प्रेरणा कार्यक्रम.
बैठकीत सुचविण्यात आलेले उपक्रम
बैठकीत उपस्थित ग्रंथालय पदाधिकाऱ्यांनी पुढील उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या –
ग्रंथालय तुमच्या शाळेत हा उपक्रम राबविणे.
विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढविणे.
विद्यार्थ्यांची वाचन अभिरुची जाणून घेणे.
विविध स्पर्धांचे आयोजन.
स्वागतशील ग्रंथालय संस्कृती निर्माण करणे.
आकर्षक वाचन दालन व ग्रंथालय सजावट.
ग्रंथालय मित्र मंडळ अधिक सक्षम करणे.
शाळांमध्ये सातत्याने वाचन उपक्रम राबविणे.
कथाकथन कार्यक्रम.
वाचन कट्टा.
ग्रंथ वाचन परीक्षण स्पर्धा.
शिक्षकांसाठी विशेष कार्यक्रम.
लेखकांशी संपर्क करून साहित्यिक कार्यक्रम.
मराठी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून उपक्रम.
वाढदिवसानिमित्त ग्रंथभेट.
मीडिया मॅनेजमेंटद्वारे प्रसिद्धी.
निबंध स्पर्धा.
ग्रंथालय आपल्या दारी उपक्रम.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ग्रंथालयाचे स्टॉल.
व्याख्यानमाला व चर्चासत्रांचे आयोजन.
पुढील कृती आराखडा
बैठकीत सुचविण्यात आले की प्रत्येक ग्रंथालयाने आपल्या परिस्थितीनुसार वार्षिक उपक्रम आराखडा तयार करावा. विविध ग्रंथालयांमध्ये समन्वय वाढवून संयुक्त उपक्रम आयोजित करावेत. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून युवकांपर्यंत पोहोचावे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधून वाचन चळवळ अधिक व्यापक करावी.
निष्कर्ष
बैठकीत झालेली चर्चा अत्यंत विधायक, सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण होती. आजच्या बदलत्या काळात ग्रंथालयांनी केवळ पुस्तकांचे संग्रहालय न राहता समाजाच्या बौद्धिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाचे केंद्र म्हणून कार्य करणे आवश्यक आहे, हा विचार सर्वांनी व्यक्त केला.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयांनी समाजाशी सातत्याने संवाद साधणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आणि सर्व वयोगटांसाठी आकर्षक उपक्रम राबविणे ही काळाची गरज असल्याचे मत सर्व उपस्थितांनी व्यक्त केले.
बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाचा सर्व उपस्थितांनी मनापासून आस्वाद घेतला. स्वादिष्ट भोजनामुळे परस्परांतील स्नेह अधिक दृढ झाला आणि अनौपचारिक चर्चेतून अनेक नवीन कल्पनांची देवाणघेवाण झाली.
सर्वानुमते असे ठरविण्यात आले की श्री मकरंद जोशी हे ग्रंथालय, वाचन, लिखाण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांनी श्री सुधीर बडे यांच्याशी चर्चा करून काही उपक्रमांच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना सर्व सहभागी ग्रंथालयाना या समूहाच्या माध्यमातून कराव्या.
शेवटी, या यशस्वी आणि प्रेरणादायी बैठकीचे आयोजन केल्याबद्दल श्री सुधीर बढे आणि श्री दिनकर गांगल ,प्राच्य विद्या अभ्यास संस्था, हजुरी, ठाणे यांचे तसेच सर्व उपस्थित ग्रंथालय पदाधिकारी, ग्रंथपाल आणि सहभागी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
डॉ विजय बेडेकर यांनी संस्थेची जागा उपलब्ध करून दिली व सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल सर्व उपस्थितानी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले.
“वाचेल तो वाचेल, वाचेल तोच घडेल आणि समाज घडविण्याची ताकद ग्रंथालयात आहे.” या भावनेने सर्वांनी भविष्यातही अशाच बैठकांद्वारे एकत्रितपणे वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
धन्यवाद!
नारायण बारसे